नागपूर: चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल अनियंत्रित हाेऊन राेडलगतच्या सिमेंटच्या दगडावर आदळली. यात एकाचा मृत्यू झाला, दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील आसाेला शिवारात शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
कार्तिक किशोर जयस्वाल (२५, रा. हनुमान नगर, बोरगाव नाका, वर्धा) असे मृताचे तर सूरज नानाजी करपाते (२३, रा. आंजी, जिल्हा वर्धा) असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते शुक्रवारी सायंकाळी एमएच-३२/एएल-९१७१ क्रमांकाच्या माेटरसायकलने नागपूरहून वर्धेला जात हाेते. दरम्यान, आसाेला शिवारात चालक सूरजचा वेगात असलेल्या माेटरसायकलवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली माेटरसायकल राेडलगतच्या सिमेंटच्या दगडावर जाेरात आदळली.
या अपघातात दाेघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांकडून माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही लगेच बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती कार्तिकला मृत घाेषित केले तर सूरजवर उपचाराला सुरुवात केली. त्याची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.