लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या जीवनावरील आनंदयात्री कादंबरीचे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम योगाभ्यासी मंडळाच्या गार्गी सभागृहात पार पडला.कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार आशा बगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. योगाभ्यासी मंडळाद्वारे प्रकाशित ही २७२ पानांची कादंबरी नागपूरच्या प्रख्यात लेखिका शुभांगी भडभडे यांनी शब्दबद्ध केली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वामींच्या समाधीला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. मंडळाचे कार्यवाह राम खांडवे गुरुजी व उपाध्यक्षा भारती कुसरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना पुरोहित यांनी नवीन पादुका निर्मितीबद्दल मंडळाची प्रशंसा केली. योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. पुरातन ऋषी-मुनींनी या भारतीय संस्कृतीचे जतन केले. ऋषितुल्य खांडवे गुरुजी जनार्दनस्वामी महाराजांचे कार्य पुढे चालवीत आहेत. हे नागपूरनगरीचे भाग्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.चरित्रात्मक कादंबरी लेखन अवघड असते. त्यात कल्पितामध्ये सत्य व सत्यामध्ये कल्पित अशी कसरत असते असे बगे यांनी तर, स्वामीजीविषयी काहीही माहिती नसताना केवळ स्वामीजींच्या प्रेरणेमुळे माझ्याकडून या कादंबरीचे लेखन झाले, असे भडभडे यांनी सांगितले. भडभडे यांचा पुरोहित व मंडळाचे अध्यक्ष सुनील सिरसीकर यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वर्षा कौशिक यांनी संचालन तर, खांडवे गुरुजी यांनी आभार व्यक्त केले.