नागपूर/अमरावती : विदर्भात ठिकठिकाणी दमदार, तर कुठे हलक्या पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता असून, त्यांची पेरणीसाठी आशा बळावली आहे.
नागपुरात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास उसंत घेतली. हवामान खात्याने सकाळी ८:३० पर्यंत ३८.८ मिमी. पावसाची नोंद घेतली. पहिल्याच पावसाने शहरातील सखल भागात व दरवर्षीप्रमाणे यंदाही पुलाखाली पाणी साचल्याचे दिसून आले. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बरसला. शुक्रवारी दिवसभर ढगाळी वातावरण होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
नागपुरात २४ तासात ३८.८ एमएम पाऊस...
गुरुवारी रात्री १० नंतर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने सकाळी ८:३० पर्यंत नोंदविलेल्या अंदाजानुसार ३८.८ एमएम पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात २ डिग्रीने घट झाल्याचे निदर्शनास आले. सकाळपर्यंत कमाल तापमान ३८.३ अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.
गडचिरोलीत हलक्या सरी...
गडचिरोली जिल्ह्यात २१ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. परंतु अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यात धान पेरणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, अर्धा अधिक जून महिना उलटूनही पाऊस बरसला नाही. २१ जून रोजी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर वातावरणातील दाह कमी होऊन थंडावा निर्माण झाला आहे. २३ जूनला हलक्या सरी बरसल्या. जोराचा पाऊस न झाल्याने पेरणीचा खोळंबा झाला आहे. सध्या पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. धान पिकाच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.
विदर्भाच्या नंदनवनातही उशिरा; पण दमदार बरसला पाऊस
चिखलदरा : मान्सूनने सर्वत्र महिनाभर उशिरा हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दमदार हजेरी लावत त्याने नंदनवन ओलेचिंब करून सोडले. सुखावह असा हा मान्सूनचा पहिला पाऊस जबरदस्त बरसला.
नंदनवनात शुभ्र धुके, शहर हरविले
पावसाच्या आगमनासोबतच पांढरेशुभ्र धुके शुक्रवारी दुपारी २ पासूनच विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर पसरले होते. त्यामुळे दिवसाही वाहनधारकांना घाटवळणातून वाहनांचे दिवे लावून काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावे लागले. आता काही दिवसांतच परिसरातील सातपुड्याचे उंच डोंगर हिरवा शालू पांघरणार आहेत.
परतवाडा, अचलपुरात पाऊस
दुपारी ४ वाजेपासून अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सोबतच परतवाडा-अचलपूर शहरातसुद्धा पावसाने आगमन केले. अमरावती शहरासह जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू, हिवरखेड, शिरसगाव कसबा परिसरातही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागांत कमी-अधिक भागात तो बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भंडारा जिल्ह्यात रिमझिम...
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात शुक्रवारी १८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा ५९ मिमी, मोहाडी ९.८, तुमसर ६.३, पवनी १.२, साकोली १५.२, लाखांदूर २.० व लाखनी तालुक्यात ३४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाची लगबग वाढली आहे. हवामान खात्याने येत्या २७ जूनपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.