लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे पूर्वज नागपुरात मुक्कामी आहेत. तब्बल १४७ वर्षापासून हे कुटुंब उपराजधानीत वास्तव्यास आहेत. आजवर जराही चर्चेत नसलेले हे कुटुंब अमेरिकेत नवे राष्ट्रपती म्हणून जो बायडेन विजयी होताच चर्चेत आले आहे. खुद्द या कुटुंबातील काही सदस्यांनीच एका वृत्तसंस्थेशी बोलताना या नातेसंबंधाचा दावा केला आहे.
जो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना २४ जुलै २०१३ ला मुंबईत आले होते. यावेळी एका समारंभात त्यांनी आपले काही पूर्वज मुंबई, नागपुरात राहत असल्याची आठवण सांगितली होती. वॉशिग्टनमधील एका कार्यक्रमातही २०१५ मध्ये त्यांनी ही आठवण सांगितली होती. १९७२ मध्ये सिनेटर बनल्यावर त्यांना भारतामधील एका नातेवाईकाचे पत्र आले होते. त्यावरून त्यांच्या कुटुंबातील एक पूर्वज भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करायचे हे कळाले. नागपुरात राहणारे के लेस्ली बायडेन यांनी हे पत्र लिहिले होते. आपले पणतू नागपुरात राहतात, असे त्यांनी कळविले होते. लेस्ली यांची पणती सोनिया बायडेन फ्रान्सिस या नागपुरात मनोचिकित्सक आहेत. नागपूर आणि भारतामध्ये अन्य ठिकाणी राहणाऱ्या बायडेन परिवारातील सदस्य जो बायडेन यांच्या विजयामुळे प्रचंड खुश असल्याचे त्या म्हणाल्या.
सोनिया म्हणाल्या, लेस्ली बायडेन नागपुरात राहायचे. ते भारत लॉज होस्टेल तसेेच भारत कॅफेमध्ये व्यवस्थापक होते. १९८३ मध्ये त्यांचे निधन झाले. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चा तत्कालीन अंक वाचून लेस्ली यांना जो बायडेन सिनेटर झाल्याचे कळले होते. १५ एप्रिल १९८१ रोजी लेस्ली यांनी जो बायडेन यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर ३० मे १९८१ रोजी मिळाले होते. आनंद व्यक्त करून त्यांनी वंशावळीबद्दल उत्सुकतेने चौकशी केली केली होती. ही पत्रे या कुटुंबीयांसाठी आता मोलाचा ठेवा ठरली आहेत.
जानेवारी २०१८ मध्ये कुटुंबाच्या भेटी
सोनिया म्हणाल्या, नागपूर, मुंबई, न्यूझीलंड आणि अमेरिकेत राहणाऱ्या बायडेन परिवारातील सदस्य लेस्ली यांचे पणतू लेस्ली डेविड बायडेन यांच्या विवाहानिमित्त जानेवारी २०१८ मध्ये एकत्र आले होते. नागपुरात लेस्ली यांची सून एंजेलिना बायडेन यादेखील राहतात. २४ जुलै २०१३ रोजी मुंबईमधील एका समारंभात जो बायडेन यांनी या पत्राबद्दल उल्लेख करून वंशावळी विशेषज्ञांनी भारतामधील आपले पूर्वज शोधण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली होती.