जिल्हाधिकारी कार्यालय : साथीदार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या दलालीविरुद्ध गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दलालांनी चांगलीच धास्ती घेतली असून ते भूमिगत झाले आहेत. या दलालांना मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू, शहर तहसील कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय कामे करवून देण्यासाठी दलाल सक्रिय आहेत. या दलालांविरुद्ध वेळोवेळी कारवाईसुद्धा करण्यात आली. दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकार घेऊन दलालांविरुद्ध मोहीम उघडली आहे. सातत्याने कारवाई केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दलालांवर वचकही बसला होता. यात काही अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे काही महिने दलाल शांत बसले होते. परंतु दहावी, बारावीच्या निकाल लागल्यापासून दलाल पुन्हा सक्रिय झाले होते. जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरच गुरुवारी गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. एकाच वेळी विविध शासकीय कार्यालयांसमोरील दलालांवर कारवाई केल्याने दलाल घाबरले आहेत. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश दलाल भूमिगत झाल्याचे दिसून आले. एखाद दुसरा दलाल परिसरात फिरताना आढळून आला. परंतु ते केवळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठीच आले असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने कारवाई केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. परंतु अशी कारवाई नियमितपणे होणे आवश्यक आहे. अन्यथा शासकीय कार्यालयातील दलाल पुन्हा सक्रिय होतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनीही दक्ष राहावे नागरिकांना पारदर्शी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. दलालांपासून नागरिकांची मुक्तता व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनानेच पुढाकार घेऊन दलालाविरुद्ध कारवाई सुरू केली. इतकेच नव्हे तर सेतू कार्यालयामध्ये आॅनलाईन सातबारा, फेरफार शिबिर, विविध प्रमाणपत्र शिबिर आदी आयोजित करण्यात आले आहे, तेव्हा नागरिकांनी सुद्धा अशा दलालांबाबत दक्ष राहावे, प्रशासनातर्फे आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा. जिल्हा प्रशासनातर्फे दलालाविरुद्धची कारवाई सुरूच राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत. - सचिन कुर्वे जिल्हाधिकारी तीन वर्षांपूर्वी केली होती सक्ती आरटीओ कार्यालय दलाल मुक्त करण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी थेट अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले होते. यामुळे कार्यालयात येणाऱ्यांना प्रवेशद्वारावरच अडवून दलाल नसल्याची शहनिशा केली जात होती. परंतु हे प्रकरण न्यायालयात गेल्याने व अधिकृत दलालांची यादी जाहीर झाल्याने ही सक्ती मागे घेण्यात आली. ‘आॅनलाईन’ तरी सुळसुळाट दलालांना फाटा देऊन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व गतीने काम होण्यासाठी आरटीओची बहुसंख्य कामे आॅनलाईन पद्धतीनेच करण्याची सक्ती आहे. असे असताना, आरटीओमधूनच ३९ दलालांना पकडणे हा चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यालयातील ‘आॅनलाईन’ प्रक्रिया दलालांच्या ताब्यात तर नाही ना, याचा शोध घेणे महत्त्वाचे झाले आहे. आरटीओतील दलाल दुपारनंतर झाले पुन्हा सक्रिय गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) तब्बल ३९ दलाल पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत कारवाई झाल्याने शुक्रवारी सकाळी या तिन्ही कार्यालयात शुकशुकाट होता. परंतु दुपारनंतर पुन्हा दलाल सक्रिय झाले. ‘क्या काम है साहब’ म्हणत कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यालयाच्या आतही दलाल दिसून आले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व सहायक आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे विविध शासकीय कार्यालयात धडक कारवाई करीत ६३ दलालांना पकडले. यात नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून १७, नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातून ११ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातूनही ११ दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईच्या धास्तीने शुक्रवारी सकाळच्यावेळी तिन्ही कार्यालयात शुकशुकाट होता. विशेषत: ग्रामीण आरटीओ कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दलालांच्या टपऱ्या ओसाड पडल्या होत्या. शहर व पूर्व आरटीओ कार्यालयातील दलाल कार्यालयापासून दूर उभे होते. परंतु दुपार होत नाही तोच हेच दलाल पुन्हा कार्यालय व परिसरात सक्रिय झाले.
अन् दलाल झाले भूमिगत
By admin | Published: July 01, 2017 2:15 AM