रामटेक (नागपूर) : अठाराविश्व दारिद्र्यात बाराही महिने नशिबाशी झुंजणारा शेतकरी अखेर हताश स्थितीत मृत्यूला कसा शरण जातो, याचे विदारक चित्र मांडायला तो तरुण चित्ररथावर स्वार झाला... नांगराला बांधलेला प्रतिकात्मक फास त्याने गळ्यात टाकला... शोभायात्रा पुढे निघाली... इतक्यात काळ चोरपावलांनी आला... गळयातला फास घट्ट झाला अन् अभिनयातून शेतक-याची दैना मांडणा-या त्या तरुणाचा श्वास थांबला... पाहणाºयांना वाटले तो अभिनयच करतोय... मात्र त्याच्या निष्प्राण देहासह शोभायात्रा गावभर फिरत राहिली... ही दुर्दैवी घटना कळल्यावर मात्र सर्वांचा थरकाप उडाला.मनोज धुर्वे (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामटेक येथे वैकुंठ चतुर्दशीनिमित्त शोभायात्रा काढण्यात येते. शोभायात्रेत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ, जिवंंत देखावे होते. राजेश सरवर याच्या नेतृत्वात ‘कास्तकाराची आत्महत्या’ या चित्ररथात मनोज गळफास लावलेला शेतकरी म्हणून सहभागी झाला होता. आंबेडकर चौकात सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. गांधी चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोजकांनी मनोजला उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
...अन् अभिनयातून शेतक-याची दैना मांडणा-या 'त्या' तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:50 AM