जिल्हा परिषद : अभियंत्यांचा कौतुक सोहळा नागपूर : जनतेचा थेट संपर्क असणाऱ्या शासकीय कार्यालयात नेहमीच धावपळ लागलेली असते. या कामाचा ताण तेथील कर्मचाऱ्यांना नेहमीच सोसावा लागतो. ग्रामीण विकासाची यंत्रणा असलेल्या जिल्हा परिषदेचेही असेच काहीसे वातावरण आहे. जनतेच्या तक्रारींसह वरिष्ठांचे बोलणे, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांक डून होणारे आरोप हा त्यांच्या व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. अशात संस्थेच्या वरिष्ठाने कौतुकाची थाप दिल्यास व्यवस्थेचा सर्व ताण विसरून, तो कर्मचारी पुन्हा नव्या उमेदीने कामास लागतो. जि.प.मध्ये काम करणाऱ्या बांधकाम विभागातील अभियंत्यांना पहिल्यांदाच अशी कौतुकाची थाप मिळाली. त्यामुळे एका छोटेखानी सोहळ्यात हे अभियंते भावुक झाले. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग महत्त्वाचा कणा आहे. हा कणा सांभाळणारे अभियंते नेहमीच सन्मान आणि कौतुकापासून उपेक्षितच राहत होते. परंतु पहिल्यांदाच जि.प.चे उपाध्यक्ष व बांधकाम समितीचे सभापती शरद डोणेकर यांच्या प्रयत्नातून इंजिनीअर्स डे च्या निमित्ताने जि.प. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांच्या सत्काराचे आयोजन सरपंच भवनात करण्यात आले होते. जि.प.च्या कार्यकारी अभियंता निता ठाकरे व व बांधकाम समितीच्या सदस्य दुर्गावती सरियाम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यात जि.प.च्या आठ उपविभागातील उपअभियंता व शाखा अभियंता तसेच पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शाखा अभियंता यांना शरद डोणेकर, निता ठाकरे व दुर्गावती सरियाम यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यात उपअभियंता राजेंद्र जैन, शाखा अभियंता निरंजन गभने, प्रकाश अंतुरकर, अनिल डोंगरे, गौतम पाटील, ए. आर. ढाले, राधामोहन पाढी, दिलीप शेगावकर, अशोक मेंढे व प्रकाश जाधव यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पंचायत समितीचे डी.डी. बिहारे व जि.प.च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे गणेश मेंढेकर, महिला अभियंता प्रतिभा वानखेडे, युवा अभियंता अपूर्वा गिरडकर, रवि मिरगे आणि मिथिलेश देशमुख यांचाही शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अभियंते जि.प.मध्ये पहिल्यांदाच झालेल्या सन्मानामुळे भावुक झाले होते. याप्रसंगी शरद डोणेकर म्हणाले की, जि.प.च्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येते. परंतु अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पुरस्कार देण्यात येत नव्हता. प्रगत देशाचे शिल्पकार असणाऱ्या या अभियंत्यांच्या कामाचाही सन्मान व्हावा, ही त्यामागची भावना होती. (प्रतिनिधी)
अन् अभियंते झाले भावुक
By admin | Published: September 17, 2016 3:11 AM