लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेगाडीतून एक तरुण खाली पडला. मित्र खाली पडल्यामुळे त्याची मैत्रीण त्याला वाचविण्यासाठी ‘धावा..त्याला वाचवा..’ असे ओरडत होती. तिने चेनपुलींग केली. परंतु तिला चेन ओढता आली नसल्यामुळे गाडी थांबली नाही. कोचमधील इतर प्रवाशांनी चेनपुलींग करण्याचे सौजन्य दाखविले नाही. तिचा मित्र घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिला. त्याला गरीबरथ एक्स्प्रेसने नागपुरात आणण्यात आले. मेयो रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये सेलू ते तुळजापूर दरम्यान घडली.अरुण दयानंद भोयर (२२) सोनेगाव, ता.गोरेगाव, जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला आई वडील, एक भाऊ आणि बहीण आहे. बहिणीचे लग्न झाले. वडील शेतमजूर आहेत. अरुण हा यवतमाळ येथील एका खासगी कंपनीत काम करतो. तर त्याची मैत्रीण प्रतीक्षा रा. शिवनी ही नागपुरात एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाला आहे. भंडाऱ्याला दोघेही एका कॉलेजला शिकत असताना त्यांची ओळख झाली होती. प्रतीक्षा बडोदा येथे परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा आटोपल्यानंतर ती रविवारी वर्धा रेल्वे स्थानकावर उतरली. तर अरुणही तिकडून वर्धेला आला. दोघांनीही मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचे तिकीट घेतले होते. जनरल डब्यातून वर्धा ते कामठी असा प्रवास करीत होते. सेलू ते तुळजापूर दरम्यान गाडी भरधाव वेगात असताना अचानक अरुण रेल्वेतून खाली पडला. प्रतीक्षाने आरडा ओरड केली. डब्यातील साखळी ओढून तिने गाडी थांबविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, साखळी ओढण्यासाठी तिची ताकत लागली नसल्याने गाडी थांबली नाही. परंतु डब्यातील एकही तरुण तिच्या मदतीला धावला नाही. तिने अजनी रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फोन करून चौकशी सुरू केली असता मागून येणाºया गरीब रथ एक्स्प्रेसच्या गार्डने माणुसकीचा परिचय देत जखमी तरुणाला गाडीत टाकून नागपुरात आणले. लोहमार्ग पोलिस गायकवाड यांनी जखमीला मेयो रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अरुणच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून आपल्या डोळ्यासमोरच मित्राचा जीव गेल्यामुळे प्रतीक्षाला धक्का बसला आहे.
अन् तिच्या डोळ्यासमोर गेला मित्राचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:08 AM
धावत्या रेल्वेगाडीतून एक तरुण खाली पडला. मित्र खाली पडल्यामुळे त्याची मैत्रीण त्याला वाचविण्यासाठी ‘धावा..त्याला वाचवा..’ असे ओरडत होती. तिने चेनपुलींग केली. परंतु तिला चेन ओढता आली नसल्यामुळे गाडी थांबली नाही.
ठळक मुद्देधावत्या रेल्वेतून पडलाविदर्भ एक्स्प्रेसमधील घटना