नागपूर : ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असताना अवघ्या १९ व्या वर्षी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले आणि कायमचे अपंगत्व आले. घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयातून कृत्रिम पाय खरेदी करणे शक्य झाले नाही. शिवाय कुणाची मदतही मिळाली नाही. त्यामुळे वर्षभर घरात अंथरुणावर पडून राहावे लागले. मात्र मागील १४ आॅक्टोबरपासून धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सुरू झालेल्या शिबिरात त्याला ‘जयपूर फूट’ मिळाले आणि तो पुन्हा दोन्ही पायावर उभा झाला. आनंद गणेश बंधाटे असे त्या तरुणाचे नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील देवळी येथील रहिवासी आहे. आनंदने बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले असून, त्याला मोठे होऊन नोकरी करायची होती. परंतु वर्षभरापूर्वी तो रेल्वेतून प्रवास करीत असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचे दोन्ही पाय गेले. शिबिरात त्याला ‘जयपूर फूट’ मिळाल्यानंतर तो म्हणाला, मला वर्षभरानंतर पुन्हा माझे पाय मिळाल्यासारखा आनंद होत आहे. या व्यतिरिक्त रामटेक तालुक्यातील नगरधन येथील ईश्वर रामचंद्र मेंढे (वय ५६) यांना वयाच्या २४ व्या वर्षी मशीनमध्ये पाय गेल्याने अपंगत्व आले. अपघातापूर्वी ते टेलरिंगचे काम करून कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. परंतु पाय निकामी झाल्याने त्यांना टेलरिंगचे काम सोडावे लागले. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ते काही काळासाठी हताश झाले. परंतु त्यांना ‘जयपूर फूट’ मिळताच ते पुन्हा आपल्या पायावर उभे झाले. या पायाच्या मदतीने आपण शेतीचे काम सुद्धा करीत असल्याचे यावेळी ईश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अन् पुन्हा पायावर उभा झालो.....
By admin | Published: October 23, 2016 2:53 AM