लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवान कृष्णाची सखी राधेला एकदा मोराचे नृत्य पाहण्याची इच्छा होते. जंगलात गेल्यावर एकही मोर तिला दिसत नाही. त्यामुळे निराश झालेली राधा कृष्णाला आर्त हाक देते. ही आर्तता ऐकून भगवंत स्वत: मोराचे रूप घेऊन नृत्य करायला लागतात. या नृत्याने भावविभोर झालेली राधा तल्लिन होऊन या नृत्यात सामील होते. या पौराणिक कथेवर आधारीत असलेले ‘मयूर’ हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ब्रिजभूमीच्या कलावंतांनी सादर केले. वर्षा ऋतूचे स्वागत आणि प्रकृतीच्या सौंदर्याप्रति हर्ष व्यक्त करणारे हे नृत्य नागपूरकरांना उल्हास देऊन गेले.दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या रजत जयंती समारोहानिमित्त आयोजित २५ व्या आॅरेंज सिटी क्रॉफ्ट मेळाव्याचे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, केंद्राचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारी सुदर्शन पाटील, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रेमस्वरुप तिवारी व जनसंपर्क अधिकारी गणेश थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.भारताच्या विविध राज्यातील पारंपरिक नृत्यांच्या रंगारंग आणि बहारदार सादरीकरणाने नागपूरकर पारंपरिक रंगात रंगले. मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध भगोरिया नृत्याने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. जंगलात राहणाऱ्या भिल्ल जातीचे हे पारंपरिक नृत्य. होळीच्या पर्वावर या नृत्याद्वारे आनंद व्यक्त करीत अविवाहित युवक-युवतींना त्यांच्या मनाप्रमाणे जीवनसाथी निवडण्याची संधी मिळते. जम्मू-काश्मीरच्या प्रसिद्ध ‘रूफ’ या पारंपरिक नृत्याने दर्शकांची मने जिंकली. आज काश्मीरमध्ये असलेले अशांततेचे वातावरण आधी नव्हते. जहांगीरच्या शब्दानुसार तो भारताचा स्वर्गच होता. आनंद होता, उल्हास होता. काश्मीरचा हा उल्हासित रंग तेथील पारंपरिक युवा कलावंतांनी अतिशय आकर्षकपणे सादर केला. ओडिशाच्या कलावंतांनीही दर्शकांना खिळवणारे ‘गुबगुडू’ हे पारंपरिक नृत्य सादर केले. तेथील सवर या आदिवासी जनजातीमध्ये हे नृत्य प्रसिद्ध असून बासरीचे स्वर आणि ‘गुडगा’ या विशिष्ट वाद्याच्या तालावर युवक-युवती ते नृत्य सादर करतात. छत्तीसगडच्या बस्तर भागातील ‘अभुजमरिया’ या आदिवासी जनजातीमध्ये प्रसिद्ध असलेले ‘ककसार’ हे पारंपरिक नृत्य तेथील युवा कलावंतांनी बहारदारपणे सादर केले. त्रिपुराचे ‘होजागिरी’ व कर्नाटकच्या ‘ढोलु कुनिथा’ या नृत्याच्या तालानेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण भारताची परंपराच नागपूरच्या भूमीत अवतरल्याचा भास शहरवासीयांना झाला.वर्ध्याला हॅन्डीक्राफ्ट विद्यापीठाचा पाठपुरावा करा : गडकरीवर्ध्याला हॅन्डलूम व हॅन्डीक्राफ्ट विद्यापीठाचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी सादर झाला होता. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना याबाबत सांगितले होते. या विद्यापीठाचा पाठपुरावा करा, अशा सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालकमंत्री बावनकुळे यांचा उल्लेख करीत राज्य शासनाला केला. या विद्यापीठामुळे विदर्भातील कलावंतांना अभ्यास व प्रशिक्षण तसेच देशविदेशात आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले. क्रॉफ्ट मेळाव्यातील नृत्याविष्काराचे कौतुक करीत ही परंपरा भारताची शान असल्याचे ते म्हणाले. नागपूरकरांनी या पर्वणीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. ‘मुझे कुछ कहना है’ आजपासून
अन् कृष्णाने ‘मयूर’ बनून राधेची हौस पूर्ण केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:07 PM
पौराणिक कथेवर आधारीत असलेले ‘मयूर’ हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ब्रिजभूमीच्या कलावंतांनी सादर केले. वर्षा ऋतूचे स्वागत आणि प्रकृतीच्या सौंदर्याप्रति हर्ष व्यक्त करणारे हे नृत्य नागपूरकरांना उल्हास देऊन गेले.
ठळक मुद्देनागपुरात विविध राज्यांमधील पारंपरिक नृत्यांचा अविष्काररंगारंग सादरीकरणाने क्रॉफ्ट मेळ्याचे उदघाटन