लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथील घटना घडली आणि गेल्या वर्षी मेयोमध्ये घडलेली ती घटना आठवून सविता इखार यांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याही दिवशी मेयो रुग्णालयात मध्यरात्री अशीच आग लागली होती आणि ड्युटीवर होत्या अधिपरिचारिका सविता इखार. या आगीमुळे आयसीयूमधील नऊ नवजात बालकांचे प्राण असेच संकटात आले होते. मात्र त्यावेळी सविता यांनी दाखविलेली समयसूचकता आणि जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसामुळे त्या नऊही नवजात बालकांना सुखरूप वाचविले. भंडाऱ्यात १० बालके आगीने गुदमरून दगावली आणि त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
एखादा अपघात घडला तर घाबरून जाऊ नये. स्वत:ला किंवा इतरांना वाचविण्यासाठी आपल्याला जे शक्य होईल ते करावे, यातही समयसूचकता अतिशय महत्त्वाची आहे. अन्यथा छोटा अपघातही मोठा अनर्थ घडवू शकतो. नेमक्या वेळी काय करायला हवे, ते कळले तर आपण स्वत:चे व इतरांचेही प्राण वाचवू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सविता राजेंद्र इखार या आहेत. इखार या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अधिपरिचारिका होत्या. आजही त्या त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. वानाडोंगरी हिंगणा येथे त्या पती व आपल्या दोन मुलींसोबत राहतात. भंडाऱ्यातील घटनेने यांसंदर्भात इखार यांच्याशी लोकमतने संवाद साधला असता त्यांनी मेयोतील त्या घटनेतील आठवणींना उजाळा दिला.
त्या म्हणाल्या खरंच ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. ३१ ऑगस्ट २०१९ ची ती मध्यरात्र होती. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात मी ड्युटीवर होते. मध्यरात्रीचे २.४५ वाजले होते. विभागात १ ते १५ वयोगटातील नऊ बाळ होते. माझी रात्रपाळी होती. मी एकटीच होती. माझ्यासमोरच शॉर्टसर्किट झाले. मी मदतीसाठी बाहेर येऊन ओरडले. आमच्या विभागाला लागूनच गायनिक विभाग होता. मी धावतच त्यांना आग लागल्याची सूचना दिली आणि परत विभागात आले. सर्वप्रथम मोठी हानी टाळण्यासाठी ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर बंद केले, नंतर चिमुकल्या बाळांना सुरक्षित बाहेर काढले. लहान बाळांना सुरक्षित बाहेर काढत असताना त्यांची ओळख पटणारे बॅचदेखील सुरक्षितपणे ठेवले. जी मुले ऑक्सिजनवर नव्हती अशा चार मुलांना दोन्ही हातात घेऊन त्यांना प्रथम बाहेर काढले. तोपर्यंत बाजूच्या गायनिक विभागातील डॉक्टर व स्टाफ मदतीसाठी धावला. मी परत आतमध्ये जाऊन अन्य पाच बालकांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी एक बाळ केवळ दोन तासाचच होतं, त्याचे वजन ७०० ग्रॅम इतकं होतं. दुर्दैवाने ते बाळ दुसऱ्या दिवशी दगावलं. मात्र त्यांच्या धाडसामुळे चिमुकल्या जीवांचे जीव वाचले. या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते.
बॉक्स
कायम अलर्ट असावेच लागते
अधिपरिचारिका जेव्हा कामावर असतात आणि विशेष करून लहान बाळांच्या अतिदक्षता विभागाच्या ठिकाणी काम करीत असताना कायम अलर्ट असतात. असावेच लागते. आम्ही आमच्या मुलांचे संगोपन जेवढं करीत नाही तेवढं संगोपन या बाळाचं करीत असतो. ते आमचे काम आहे आणि आम्ही ते चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण ते बाळ पूर्णपणे आमच्याच भरवशावर तिथे असते. मला आज खूप आनंद आहे की त्या बाळांना मला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. त्या बाळापैकी अनेक जण उद्याचे यशस्वी नागरिक होतील, असे इखार यांनी सांगितले.