नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सायंकाळी शिर्डीवरून नागपुरात घरी परतले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते काहिसे चिंतेत होते. परंतु, घरी वाहनातून उतरताच त्यांनी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे सगळ्यांशी हास्यविनोद सुरू केला.
"वास्तविक शिर्डी येथील प्रचार सभेत भाषण देत असताना मला तहान लागली. मी पाणी मागितले. त्यामुळे माझ्या सुरक्षा रक्षकाचा गैरसमज झाला आणि त्याने माझा हात पकडून खुर्चीत बसविले. प्रचंड उकाड्यामुळे थकवाही जाणवत होता. त्यामुळे उपस्थित घाबरले. पाणी पिल्यानंतर मला बरे वाटले. परंतु, भोवळ आल्याची चर्चा पसरली. वास्तविकता मला भोवळ आली नाही", असे नितीन गडकरी यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. तसेच, संध्याकाळी भेटीला येणारे हितचिंतक आणि कुटुंबियासमवेत ते नेहमीप्रमाणे हास्यविनोदात रंगले होते.
दरम्यान, सध्या नितीन गडकरी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आज शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चर्चा झाली.
(शिर्डीतील प्रचारसभेत नितीन गडकरींची प्रकृती पुन्हा बिघडली)