नागपूर : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहे. चित्रपटात भीतीदायक खलनायक साकारणारा हा अभिनेता वृक्षांसाेबत प्राण्यांबाबतही तितकाच संवेदनशील आहे. हीच संवेदनशीलता त्यांना नागपूरच्या सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरकडे घेऊन आली. प्राण्यांवर उपचार हाेत असलेले अशाप्रकारचे भारतातील हे एकमेव केंद्र हाेय. हे केंद्र पाहण्याचा माेह सयाजी यांनाही आवरला नाही. बुधवारी त्यांनी या केंद्राला भेट देत प्राण्यांवर कशाप्रकारे उपचार हाेताे, याची माहिती घेतली.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सयाजी शिंदे गेल्या दिवसांपासून विदर्भात आहेत. त्यांनाही विदर्भातील वाघांनी भुरळ घातली हाेती. त्यामुळे त्यांनी व्याघ्रदर्शनासाठी बाेर आणि उमरेड-कर्हांडला व्याघ्र प्रकल्पाची भ्रमंती केली. मात्र, बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी ‘कॅटरिना’ने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला नाही, उलट निसर्गप्रेमाने ते भारावले. वन्यजीवांवरील उपचाराच्या पद्धती त्यांना बघायची हाेती. बोर व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांना घेऊन ते ट्रान्झिट सेंटरमध्ये आले. सयाजी शिंदे यांनी या केंद्रातील प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने न्याहाळली. फक्त न्याहाळलीच नाही तर त्या प्रत्येक प्राण्याविषयी आणि त्याच्या उपचाराविषयी त्यांनी गांभीर्याने जाणून घेतले. वन्यजीव तज्ज्ञ कुंदन हाते यांनी त्यांना या संपूर्ण केंद्राविषयी आणि येथील वन्यप्राणी उपचारपद्धतीविषयी माहिती दिली. वन्यजीव उपचार कार्यात अतुलनीय कार्य करणाऱ्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील सर्वांचे त्यांनी कौतुक केले. ट्रान्झिटच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांनी त्यांचे रोपटे देऊन स्वागत केले.
सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ या संस्थेच्या माध्यमातून माळरानावर झाडांचे नंदनवन फुलविले. एवढेच नाही तर देशातील पहिले वृक्षसंमेलन त्यांनी आयोजित केले. आतापर्यंत साधारण २२ देवराई, एक वृक्ष बँक, १४ गड किल्ले यासोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान चार लाखांपेक्षा अधिक वृक्षारोपण केले. या संस्थेच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र हरित करण्यासाठी सयाजी धडपडत आहेत.