अभय लांजेवार
उमरेड (नागपूर) : ‘ती’ नऊ महिन्यांची गरोदर होती. अशातच सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तिला प्रसववेदना सुरू झाल्या. सर्व प्रयत्न करूनही मदतकार्य मिळाले नाही. अशातच संकटात सापडलेल्या गरोदर मातेसाठी आशावर्कर आणि पोलिसांची सतर्कता मोलाची ठरली. प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला सुखरूप ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार मिळाले. चिमुकल्या बाळाचा जन्म झाला. गरोदर मातेला चिमुकल्याच्या रूपात ‘दिवाळी गिफ्ट’ मिळाले.
उमरेड येथून १२ किमी अंतरावरील चारगाव (गोटाडी) येथे ही हृदयाचे ठोके वाढविणारी घटना घडली. शेवट गोड झाल्याने अनेकांनी आनंद साजरा केला. रंजना प्रमोद सावसाकडे असे गरोदर मातेचे नाव असून, तिची आणि बाळाची दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.
निर्मलाबाई नरेश गजबे, रा. चारगाव गोटाडी असे आशावर्करचे आणि प्रदीप चौरे, तुषार गजभिये अशी प्राण वाचविणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तिघांच्याही मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रंजना सावसाकडे हिला साेमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्या. लागलीच कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. आशावर्कर निर्मला गजबे मदतीला धावल्या. १२ किमी अंतरावर असलेल्या उमरेड येथील रुग्णालयात गरोदर मातेला पोहोचवायचे कसे, असा यक्षप्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला.
आशावर्करनी रुग्णवाहिका, आरोग्य विभाग, आप्तस्वकीयांशी संपर्क साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काहींशी संपर्क झाला तर काहींकडून प्रतिसाद मिळाला नाही. लगेच निर्मला यांनी ११२ क्रमांकावर डायल केला. दरम्यान, उमरेड परिसरात प्रदीप चौरे, तुषार गजभिये हे दोघे पाेलीस कर्मचारी गस्तीवर होते. त्यांनी प्रतिसाद देत केवळ १५ ते २० मिनिटांत चारगाव गोटाडी गाव गाठले. कोणत्याही प्रकारची हयगय न करता गरोदर मातेस पोलीस व्हॅनच्या माध्यमातून उमरेड ग्रामीण रुग्णालयात सहीसलामत पोहोचते केले.
डॉक्टरांनीसुद्धा वेळीच दखल घेतली. तिच्यावर औषधोपचार आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. केवळ १५ मिनिटांतच रंजनाने गोंडस बाळाला जन्म दिला. माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती बरी असून, आशावर्कर आणि पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, उमरेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार मिश्रा, सचिव हरीश नान्हे यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी प्रमोद चौरे आणि तुषार गजभिये यांचा सत्कार करण्यात आला.