नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) कोअर झोनमध्ये रविवारी पहाटेच्या सफारीदरम्यान अंगावर काटा येणारा प्रसंग घडला. येथे प्रसिद्ध असलेली माया वाघीण आणि तिचे शावक अगदी काही फूट अंतरावर असताना एक पर्यटक त्यांच्या जिप्सीतून खाली पडला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पडलेला व्यक्तिसाेबत इतरही पर्यटक हादरून गेले हाेते. प्रसंगावधान साधून सहपर्यटकांनी त्याला जिप्सीत परत आणले खरे; पण या घटनेमुळे सफारीदरम्यानच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये रविवारी घटना घडली. माया वाघीण आणि तिचे शावक ऐटीत जात होते, तेवढ्यात पर्यटकांचे वाहन आले. अचानक पर्यटकांना पाहून माया थांबली अन् तिने नुसते रागाने पर्यटकांकडे पाहिले. त्यामुळे पर्यटकांची भंबेरी उडून एक पर्यटक जिप्सीतून खाली पडला.
आता क्षणात पुढे काय होणार, यामुळे धस्स झाले. परंतु प्रसंगावधान राखून इतर पर्यटकांनी पडलेल्या पर्यटकाला लगेच जिप्सीत ओढले. त्यामुळे त्याच्यासह इतरांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पडलेल्या व्यक्तीसोबत इतरही पर्यटक हादरून गेले होते. पर्यटक गेल्यानंतर माया वाघिण तिच्या शावकासह अशी दिमाखात निघून गेली.