लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आता स्मार्ट होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘पोषण अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडीतून बालकांसह स्तनदा गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासोबतच, विविध योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट (अॅन्ड्राईड) फोन सिमकार्ड व डाटाप्लॅनसह देण्यात येणार आहे.पोषण अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. त्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांतील खुजे/बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांतील रक्तक्षय, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे. तसेच किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे. सोबतच बाळाच्या जन्मानंतरचे पहिले एक हजार दिवस यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण करणे, यामध्ये इमारत बांधकाम, बालकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, शौचालय सुविधा, आदींसह प्रभावी आरोग्य सेवा देणे. महिलांची प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात आरोग्य तपासणी. बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य-शिक्षण आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बालकांतील कुपोषणाचे प्रमाण येत्या तीन वर्षात दरवर्षी दोन टक्क्यांप्रमाणे सहा टक्के कमी करण्यात येणार आहे. यासोबतच अॅनेमियाचेही प्रमाण दरवर्षी तीन टक्क्यांप्रमाणे तीन वर्षांत नऊ टक्के कमी करण्याचे नियोजनबध्द प्रयत्न होणार आहेत. या सर्व कामकाजाची माहिती, संचालनाची जबाबादारी अंगणवाडी सेविकांवर आहे. सर्व कामांचा इत्थंभूत डाटा अॅण्डरॉईडच्या माध्यमातून अधिकाºयांना वरिष्ठ पातळीवर उपलब्ध होता यावा म्हणून स्मार्ट फोन त्यांना देण्यात येणार आहे.
या माध्यमातून होणार अंगणवाडीचे डिजिटलायझेशनजिल्ह्यात २४२३ तर शहरात ९८१ अंगणवाड्या कार्यरत आहे. या अभियानांतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांना अॅन्ड्राईड फोन सीमकार्ड व फोरजी नेटवर्क डाटा प्लॅनसह देण्यात येणार असून, यामार्फत अंगणवाडी केंद्राचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रती ३ महिन्याकरिता ४०० रुपये प्रमाणे एका वर्षासाठी १६०० रुपये प्रतिअंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना देण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच शंभर टक्के बालकांचे आधारकार्ड काढणे, केंद्रामध्ये दरमहा ‘व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अॅन्ड न्यूट्रेशन डे’ व ‘कम्युनिटी बेस इव्हेंट’ साजरी करण्यात येईल.