कामठी (नागपूर) : राज्य सरकारने आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी (दि. २१) कामठी शहरातील कामठी- कळमना मार्गावर असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत धरणे आंदाेलन केले. यावेळी शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी एस. निमजे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे असलेले निवेदन साेपविले.
अंगणवाडी सेविकेला दरमाह ८,३०० रुपये, सहायक अंगणवाडी सेविकेला ५,८०० रुपये आणि मदतनीस महिलेला ४,२०० रुपये मानधन दिले जात असून, वाढती महागाई लक्षात घेता हे मानधन अत्यल्प आहे. आपल्याला सरकारकडून काेणताही महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे अधिक काम करून आर्थिक विवंचनेला सामाेरे जावे लागते. यावर उपाय म्हणून आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युटी लागू करावी, अंगणवाडी केंद्रांच्या किरायात वाढ करावी, कार्यक्षम मोबाइल हॅण्डसेट द्यावे, १४ सप्टेंबर २०२२ रोजी महिला बालकल्याण विकास मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असून, या मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आल्याचे आंदाेलक अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
आयटक अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कामठी शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदाेलनात विशाखा हाडके, विद्या गजभिये, भारती नगरकर, लता घोडके, रजनी पाटील, विनिता मोटघरे, कुंदा मानकर, सुगंधा मारवाडे, मनीषा बन्सोड, मंगला दुधपचारे, मनीषा सहारे, अरुणा बांते, सविता आतकर, कीर्ती रथकंटीवार, अश्विनी चांदोरकर, संगीता पाटील, रेखा बावनकुळे, सुप्रिया कांबळे, लता मेश्राम, रचना राऊत, रंजना फुले, सुषमा सहारे, रिना नागपुरे, सविता फुलझेले, कोमल वाहने, संगीता चहांदे, प्रतिभा खोब्रागडे यांच्यासह कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या हाेत्या.