लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फाेन देऊन ॲपवर माहिती नमूद करण्याच्या सूचना दिल्या. ते ॲप इंग्रजीत असल्याने अंगणवाडी सेविकांना हाताळायला कठीण जात असल्याने त्यांनी ॲप मराठीत उपलब्ध करून देण्याची अनेकदा मागणी केली. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी गुरुवारी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करीत सर्व माेबाइल फाेन परत केले.
राज्य शासनाने महिला व बालकल्याण विभागातील सर्व कामे तीन वर्षांपूर्वी ऑनलाइन केली. त्याअनुषंगाने अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फाेन देण्यात आले. त्या फाेनमधील ॲपवर सर्व कामे करण्याच्या सूचनाही शासनाने केल्या. ते ॲप इंग्रजीत असल्याने तसेच अंगणवाडी सेविकांचे शिक्षण फारसे नसल्याने त्यांना इंग्रजीत ॲपवर माहिती भरणे कठीण जात आहे.
परिणामी, हे ॲप मराठीत असावे. त्यामुळे ते हाताळायला व त्यावर माहिती भरायला साेपे जाईल, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे अनेकदा केली. शासनाने या मागणीकडे लक्ष न दिल्याने गुरुवारी हिंगणा तालुक्यात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. त्यांनी त्यांच्याकडील सर्व माेबाइल फाेन महिला प्रकल्प अधिकारी बापूसाहेब चिंचाणे यांच्याकडे साेपविले.
या आंदाेलनात हिंगणा तालुक्यातील २४९ अंगणवाडी सेविका व २०१ मदतनीस अशा एकूण ४५० महिला सहभागी झाल्या हाेत्या. यात श्याम काळे, करुणा साखरे, आशा बोदलखंडे, कामिनी खंगार, लालन मेश्राम, वर्षा केदार, पंचशीला रामटेके, अर्चना रुसेसरी, वर्षा मानकर, अनिता रामटेके, छाया पवार, कुसुम खोब्रागडे, आशा घवघवे, कुसुम सातपुते, करुणा ठाकरे, मंगला नखाते, अर्चना साखरकर यांच्यासह अन्य अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा समावेश हाेता.
...
नवीन ॲप कठीण
शासनाने अलीकडे नवीन ॲप दिले आहे. ते इंग्रजीत असून, त्यावर राेज माहिती भरणे अनिवार्य आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने ते हाताळणे कठीण जात आहे. अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेल्या माेबाइल फाेनचा दर्जा सुमार असल्याने ते हँग हाेण्याचे व त्यात बिघाड निर्माण हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाने एक तर चांगल्या दर्जाचे माेबाइल फाेन द्यावे नाही तर दुरुस्ती खर्च द्यावा, अशी मागणीही अंगणवाडी सेविकांनी केली आहे.