सीईओ बलकवडे यांना निवेदन सादर नागपूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) च्यावतीने अंगणवाडी कर्मचारी महिला सोमवारी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेवर धडकल्या. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी बराच वेळ ठाण मांडला. यानंतर शामजी काळे यांच्या नेतृत्वात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच मागणीचे निवेदन सादर केले.निवेदनात अंगणवाडी-बालवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्यात यावे, त्यांच्या प्रकल्प कार्यालयात पर्याप्त कर्मचारी नेमण्यात यावे, पर्यवेक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकेचा दर्जा देण्यात यावा, बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराचे इंधन बिल वाढवून द्यावे, गॅस कनेक्शन देण्यात यावे, अंगणवाडी केंद्रांना येणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचते करावे आदी मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात वनिता कापसे, उषा चारभे, ज्योती अंडरसहारे, जयश्री चहांदे, आशा बारेलखंडे, करुणा साखरे, वर्षा मानकर, प्रीती राहुलकर, कल्पना शेवाळे, रेखा कोहाळ आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचारी धडकल्या जि.प.वर
By admin | Published: February 07, 2017 2:00 AM