केंद्र सरकारचा निषेध : अर्थसंकल्पाची केली होळी नागपूर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कपात केल्याबद्दल अर्थसंकल्पाची होळी करून आपला निषेध व्यक्त केला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्याच्या महासचिव शुभा शमिम आणि अध्यक्ष मधुकर भरणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मधुकर भरणे यांनी सांगितले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात एकात्मिक बालविकास सेवा योजनेवरील खर्चात कपात करून अंगणवाड्या बंद करण्याचे कारस्थान सरकार रचत आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेवर ५० टक्के कपात करण्यात आली होती. सध्या देशात १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्या असून त्यात २४ लाख ५६ हजार कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. ८ कोटी कुपोषित बालकांचे आरोग्य व त्यांना प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण आणि १ कोटी ९० लाख गर्भवती व कुपोषित महिलांची काळजी त्याकडे विशेष लक्ष पूरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. गरीब व कुपोषित बालकांसाठी हा सर्वात मोठा उपक्रम असून त्याला बंद पाडण्याचे कारस्थान शासनातर्फे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. ही योजना बंद न करता त्यावरील तरतूद वाढविण्यात यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक प्रश्नांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आंदोलनात संगीता गजबे, चंदा मेंढे, शशी काळे अनुपमा नाईक आदींसह मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका सहभागी होत्या. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक
By admin | Published: March 05, 2016 3:10 AM