नागपूर : महाराष्ट्रातून वेदांतापाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गेला. दोन्ही उद्योग शेजारच्या गुजरातने पळविले. या दोन उद्योगांनी दोन लाखांवर तरुणांची निराशा झाली आहे. एअर बस प्रकल्प विदर्भात हाेणार हाेता. मिहानमध्ये हाेणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला. सव्वा लाख बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र विदर्भाच्या तोंडात आलेला घास हिरावला. आता विदर्भद्राेह्यांना येथील जनताच धडा शिकविणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांनी व्यक्त केले.
टाटा एअर बस प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा होता. हा भांडवली उद्योग होता, असे उद्योग स्थायी असतात. कोट्यवधींची यंत्रसामग्री लावली जाते. सातत्याने उत्पादन प्रक्रिया चालते. स्थायी रोजगार निर्मिती होते. त्यातून त्या भागाचा झपाट्याने विकास होतो, असे सांगत माेहिते यांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट करीत याबाबत विस्तृतपणे विचार व्यक्त केले. भांडवली उद्योग आणण्यास अनेक वर्ष लागतात. सहजासहजी असे मोठे उद्योग येत नाही. तो मिहानमध्ये येणार हाेता, या माध्यमातून मिहानचा कायापालट होणार होता.
लाखो तरुणांना राेजगार मिळून तेवढ्याच कुटुंबाचे नशीब बदलणार होते. मात्र त्यास राजकारण्यांची नजर लागली. हे राजकारणी एजंट विकासाच्या गप्पा मारतात. तेच विदर्भाच्या जीवावर उठतात. साधा विरोध करीत नाहीत. हा प्रकल्प विदर्भातून जाणे हा खूप माेठा धक्का आहे. अगोदर वेदांता प्रकल्प पळविला तो प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. तेव्हा लवकरच महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प देऊ असे सांगण्यात आले हाेते. मात्र तसे न करता आता त्यापाठाेपाठ एअरबस प्रकल्पही पळविला. मागासलेल्या विदर्भातील उद्योग पळविणे हा भागातील जनतेवर दुहेरी अन्याय आहे. यासाठी वैदर्भीय जनता असे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही माेहिते म्हणाले.