लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना त्रास देण्यात येत आहे. काही मोठ्या महाविद्यालयांनी तर कोरोनाचे कारण देत प्राध्यापकांच्या वेतनात मोठी कपात केली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील विद्यापीठ प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याने प्राध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कोरोना काळात जाणूनबुजून महाविद्यालयांनी प्राध्यापकांचे वेतन कापून त्यांना मनस्ताप दिल्याचा आरोप नुटातर्फे करण्यात आला. महाविद्यालयांच्या अनियमिततेविरोधात मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलनदेखील करण्यात आले.
सध्या विद्यापीठाशी संलग्नित विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे गठित व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून गठित करण्यात आलेली समिती भेटी देत असून, तेथील अनियमित कारभाराबद्दल विद्यापीठाला अहवाल सादर करीत आहे. मात्र यावरदेखील महाविद्यालयाने पाऊल उचलले नाही. प्राध्यापकांनी आता कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, प्राधिकरण सदस्यांनी प्राध्यापकांचा मुद्दा लावून धरण्याचे निश्चित केले आहे. काही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची स्थिती फार खराब झाली आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाकडून त्यांची कोंडी करण्यात येत आहे. समितीत काम करीत असताना आम्ही याचा अनुभव घेतला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून या प्राध्यापकांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मत व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी व्यक्त केले.