उमरेड : वीज थकबाकीच्या कारणावरून ग्रामपंचायतीअंतर्गत होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची वीज कापण्याचा धडाका विद्युत वितरण कंपनीने सुरू केला आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांपासून ही थकबाकीची रक्कम असून ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलल्या जात आहे. दुसरीकडे वीज कापली गेल्याने पाणीसंकटाचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्येही संतापाचा भडका उडत आहे.
मागील काही दिवसात किन्हाळा, बोथली, परसोडी (हळदगाव), हिवरा, सुकळी, चनोडा आदी ग्रामपंचायतींमधील पाणीपुरवठ्याची वीज कापण्यात आली आहे. यापैकी काही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा करण्यासाठी धाव घेतली असून, ग्रामपंचायतीने करवसुलीच्या रकमेतून थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन विद्युत वितरण कंपनी करीत आहे. कोरोनामुळे करवसुलीचे काम थंडबस्त्यात आहे. ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही, अशीही बाब समोर येत आहे. यातून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत. पाणीपुरवठ्याची वीज कापल्यानंतर अनेकांनी हातपंप आणि विहिरीकडे पाण्यासाठी धाव घेतली आहे.
११७ पाणीपुरवठा योजना
उमरेड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ११७ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या वीजपुरवठा या योजनावर असून मागील वर्षाची ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. अनेकांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही थकबाकी भरली नाही. तोच यावर्षीसुद्धा विद्युत बिल धडकल्याने या थकबाकीत वाढ झाली. यावर्षी ४० लाख रुपयांची थकबाकी असून, थकबाकीची रक्कम ७१ लाख रुपये झाली आहे.
पथदिव्याचे तीन कोटी
उमरेड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १७३ स्ट्रीट लाईटचे कनेक्शन आहेत. या पथदिव्यांची तीन कोटी एक लाख रुपये थकबाकी असून, येत्या काही दिवसात या पथदिव्याखालीसुद्धा अंधारच होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी आरडाओरड होताच जिल्हा परिषदेने थोड्या फार रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे थकबाकीची परिस्थिती ‘जैसे थे’च झाल्याचे दिसून येत आहे.
-
विद्युत बिलाची थकबाकी असल्याने ही कारवाई वीज कंपनीने केली. त्यानंतर आम्ही एक आठवड्याची मुदत मागितली आहे. त्यांनी आमची विनंती मान्य केली. प्रत्येक ग्रामसेवकाला सूचना दिल्या असून, लवकरच या बिलांचा भरणा होईल.
जयसिंग जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, उमरेड