नागपूर : पानठेल्याची उधारी मागितली असता पैसे द्यायचे सोडून आरोपीने विधी संघर्षग्रस्त बालकासह उधारी मागणाऱ्या पानठेला चालकास चाकूचा धाक दाखवून ५०० रुपये मागून ‘तेरा काम कर दुंगा’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पानठेला चालकाच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
मुकेश जितलाल पाटील (३०, क्वार्टर नं. २०४, मिनिमातानगर पाच झोपडा, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीबहाद्दराचे नाव आहे. तर बंटी राजेश शाहु (३१, क्वार्टर नं. १९२ चे समोर मिनिमातानगर पाच झोपडा) असे पानठेला चालकाचे नाव आहे. तो आपल्या घरीच पानठेला चालवितो.
१६ मार्चला रात्री ९.३० वाजता बंटी पानठेला चालवित असता आरोपी मुकेश बंटीच्या घरासमोर आला. तेंव्हा बंटीने आरोपी मुकेशला पान मसाल्याच्या उधारीचे पैसे मागितले. त्यावर आरोपीने पैसे देण्यास नकार देऊन आपला साथीदार विधी संघर्षग्रस्त बालकास बोलावले. त्यांनी पानठेलाचालक बंटीसोबत धक्काबुक्की करून ‘तेरे कायके उधारी के पैसे’ असे म्हणून अश्लील शिविगाळ केली व बंटीला चाकूचा धाक दाखवून ‘तु मुझे अभी के अभी ५०० रुपये दे नही तो तेरा काम कर दुंगा’ अशी धमकी देऊन चाकू हवेत फिरवला. या प्रकरणी पानठेला चालक बंटीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांसह, सहकलम ४/२५, भारतीय हत्यार सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.