नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने गुरुवारी निषेध नोंदविला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा भर दुपारी काढून ‘राम नाम सत्य है’ म्हणत मोक्षधाम घाटावर नेण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून घरी स्वयंपाक करावा किंवा स्मशानात जावे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने खरपूस समाचार घेतला. शहर युवती अध्यक्ष पूनम रेवतकर यांच्या नेतृत्वात बबिता मांडवकर, प्रीती, सुनीता खत्री, संगीता खोब्रागडे, ज्योती लिंगायत, रिजवान अन्सारी, अशोक काटले, नूतन रेवतकर, प्रणय जांभुळकर, अनिल बोकडे आदींनी गणेशपेठ येथील कार्यालयातून चंद्रकांत पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. मोक्षधामपर्यंतच ही अंत्ययात्रा नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.
कोणत्याही महिला नेत्यांबाबत अवमानजनक शब्द वापरणे योग्य नाही. यावरून भाजप नेत्यांची मानसिकता दिसून येते. भाजप नेत्यांनी अशी महिला विरोधी वक्तव्ये थांबवावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या युवती कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
- पूनम रेवतकर, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस