विभागाकडूनही दिलासा नसल्याने पालकांमध्ये नाराजी
नागपूर : नंदनवन परिसरातील एका शाळेपुढे गुरुवारी सकाळी शेकडो पालकांचा संताप बघायला मिळाला. स्कूल फीच्या बाबतीत शाळेकडून पालकांना लावण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे पालक त्रस्त झाले होते. विभागाला तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजी होती. शिक्षण अधिकारी हटाव, अशी जोरकस मागणी पालकांनी लावून धरली होती.
कोरोना संक्रमणामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका पालकांनाही बसला आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात वाद वाढले आहे. हा वाद विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असून, न्यायालयातही प्रकरण गेले आहे. दररोज शहरातील वेगवेगळ्या भागात शाळेंकडून सुरू असलेल्या मनमानी फी वसुलीमुळे आंदोलन व्हायला लागली आहेत. नंदनवन येथील एका शाळेनेसुद्धा पालकांकडून मनमानी फी वसुलीचा तगादा लावला होता. पालकांचे म्हणणे आहे की ट्युशन फी भरायला आम्ही तयार आहोत; पण इतर बाबींचे शुल्क द्यायला आम्ही तयार नाही. पालकांचे म्हणणे ऐकून घ्यायला शाळा प्रशासन तयार नाही. यासंदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडेही तक्रारी केल्या आहेत; पण दखल घेतली गेली नाही. अखेर पालकांचा संताप सकाळी शाळेपुढे व्यक्त झाला; पण शाळा प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने पालकांनी पुन्हा १३ जून रोजी रिझर्व बँक चौकात आंदोलनाचा इशारा दिला आहे.