नागपूर : अनाेळखी व्यक्तीला नाेटा माेजायला देणे बँक खातेदाराच्या अंगलट आल्याची घटना माैदा शहरात नुकतीच घडली. बंडलमध्ये जुनी नाेट असल्याची बतावणी करत अनाेळखी व्यक्तीने बँक खातेदाराला विश्वासात घेत बंडल माेजायला घेतले आणि हातचलाखीने बंडलामधील १८ हजार रुपये काढून चाेरून नेले.
यशाेदा प्रल्हाद तिघेर (४०, रा. केसलापूर, ता. माैदा) यांचे भारतीय स्टेट बँकेच्या माैदा शाखेत बचतखाते आहे. त्यांनी मंगळवारी (दि. २१) दुपारी या बँकेतून ५० हजार रुपयांची उचल केली. त्यांचे पती प्रल्हाद तिघरे बँकेत नाेटा माेजत असताना अनाेळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने बंडलमध्ये जुनी नाेट असल्याचा बतावणी केली. त्याने प्रल्हाद यांना विश्वासात घेत त्यांच्याकडील नाेटा स्वत:कडे घेत माेजायला सुरुवात केली.
यात त्याने हातचलाखीने १८ हजार रुपये काढून घेत ३२ हजार रुपये प्रल्हाद यांच्या हातावर ठेवले व निघून गेला. काही वेळाने त्या बंडलमध्ये ३२ हजार रुपये असून, त्यातील १८ हजार रुपये अनाेळखी व्यक्तीने चाेरून नेल्याचे प्रल्हाद यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नाेंदवून त्याचा शाेध सुरू केला आहे.