नागपूर : चुलत भावाला टपरी चालविण्यासाठी खंडणी मागितली. ती देण्यास नकार देऊन तहसिल पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध ७ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून सहा आरोपींनी एका युवकाला मारहाण करीत त्याला विहिरीत फेकून त्याचा खून केला. ही बाब तीन महिन्यानंतर पोलिस तपासात उघड झाली असून, पाचपावली पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले आहे.
मोहम्मद फरहान उर्फ अन्ना मोहम्मद नियाज नाजा (१९, रा. महात्मा फुले बाजार, बोरीयापूरा मोमिनपुरा गरीब नवाज मस्जीदजवळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर लतिफ उर्फ हेदराबादी ताजुद्दीन शेख (२०, रा. मोहम्मदीया मदरसाजवळ, डोबी, मोमिनपुरा), मोहम्मद उर्फ एमपीडी मोहम्मद असलम (३०), अब्दुल वसीम उर्फ वस्सी अब्दुल अजीज (२५), रेहान उर्फ मोटु उर्फ मुक्का रियाज शेख (२५), जुनेद मोहम्मद असलम (२५) सर्वजण रा. डोबी, मोमिनपुरा, तहसिल, इरफान उर्फ गझनी रेहमान खान (३५, रा. मोतिबाग पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.
मोहम्मद फरहान उर्फ अन्नाचा चुलतभाऊ हा तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत टपरी चालवित होता. परंतु टपरी चालवायची असल्यास १० हजार रुपये खंडणी द्यावी, लागेल अशी धमकी आरोपींनी त्याला दिली. मृतक मोहम्मद फरहान उर्फ अन्नाने खंडणी देऊ नको, असे चुलतभावाला सांगून आरोपींविरुद्ध तहसिल पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आरोपी लतिफ उर्फ हैदराबादी याने २१ एप्रिलला रात्री ८.३० वाजता मोहम्मद फरहानला बोरीयापुरा तहसिल चिकनच्या दुकानासमोरून काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हावर बसवून राय आशियाना कॉम्प्लेक्स शेजारी, नोगा फॅक्टरीमधील रेल्वे रुळाजवळ असलेल्या विहिरीजवळ नेले. तेथे आधीपासून इतर आरोपी हजर होते. त्यांनी मोहम्मद फरहानला शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विहिरीत फेकले.
मोहम्मद फरहानने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याला बाहेर न येऊ देता पाण्यात बुडवून ठार केले. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला होता. तपासात आरोपींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३६४, ३०२, ५०४, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी लतिफ उर्फ हैदराबादीला अटक केली.
इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पाचपावली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत, तहसिलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बुआ, उपनिरीक्षक महेश घोडके, सुनिल तिडके, उपनिरीक्षक रसुल शेख यांनी केली.