बोर्डा येथील घटना : बालकास चिरडलेमनसर : किराणा दुकानात जात असलेल्या बालकाच्या सायकलला मुरुम घेऊन जात असलेल्या भरधाव टिप्परने कट मारला. त्यामुळे बालकाचा सायकलवरील ताबा सुटला आणि तो सायकलसह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आला. त्यात घटनास्थळीच मृत्यूू झाला. परिणामी, संतप्त नागरिकांनी मुरमाची वाहतूक करणारे एकूण आठ टिप्परसह एक टँकर जाळला. विशेष म्हणजे, हा बालक त्याच्या आई-वडिलांसोबत बोर्डा येथे पाहुणा म्हणून आला होता. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्डा (सराखा) येथे शुक्रवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. मनीष पंढरी देवगडे (८, रा. पांढुर्णा, जिल्हा नागपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. तो बोर्डा (सराखा) येथील रहिवासी मारोतराव धारणे यांचा भाचा होय. मारोतराव धारणे यांच्याकडे लग्नसमारंभ असल्याने मनीष हा त्याच्या आई-वडिलांसोबत लग्नात सहभागी होण्यासाठी बोर्डा येथे आला होता.मुरुमाच्या टिप्परने कट मारलानागपूर : घरच्या मंडळींच्या सांगण्यावरून मनीष घराजवळच्या किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी एकटाच सायकलने जात होता. तो मार्गात असतानाच बोर्डा परिसरातील जंगलातून मुरुन घेऊन नागपूर - जबलपूर राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक -७ कडे जात असलेल्या भरधाव टिप्परने त्याला कट मारला. त्यामुळे मनीषचा तोल गेला आणि तो टिप्परच्या मागच्या चाकाखाली आला. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यात मनीषला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला लगेच मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात होताच टिप्परचालकाने टिप्परसह घटनास्थळाहून पळ काढला. लागलीच सदर अपघाताची माहिती रामटेक पोलीस व मनसर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्याचवेळी नागरिकांना एक टिप्पर मुरुम आणण्यासाठी जंगलाकडे जात असल्याचे आढळून आले. नागरिकांनी हा टिप्पर अडवून त्याला पेटवून दिले. त्यानंतर नागरिकांनी या परिसरातील मुरमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, बोर्डापासून अंदाजे दीड कि. अंतरावर दोन आणि मुरमाच्या खाणीजवळ पाच टिप्पर आढळून येताच या सर्व टिप्परला आगी लावण्यात आल्या.(वार्ताहर)
संतप्त नागरिकांनी आठ टिप्पर जाळले
By admin | Published: May 07, 2016 2:49 AM