नागपूर : एखाद्या व्यक्तीने आपल्या पदाला शोभणारे वर्तन न केल्यास ‘सोशल’ माध्यमांवर ती गोष्ट ‘व्हायरल’ व्हायला वेळ लागत नाही. असाच अनुभव खासदार अनिल बोंडे यांना आला.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त अमरावतीत शिवव्याख्याते तुषार उमाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांचे नाव काही लोक नको त्या गोष्टींत घेत असून त्यांना महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता असे त्यांना वाटते, असे वक्तव्य उमाळे यांनी केले. यावर मंचावरच बसलेले अनिल बोंडे यांनी त्यांना ‘ए शहाण्या मूर्ख आहेस का’ असे म्हटले. त्यावर उमाळे यांनी ‘तुम्ही मूर्ख आहात का’ असे लगेच प्रत्युत्तर दिले. यामुळे उपस्थितांसह बोंडे यांनादेखील धक्काच बसला.
एका खासदाराला सार्वजनिक मंचावर असे प्रत्युत्तर मिळाल्याने बोंडे संतापले व ते उमाळे यांच्या दिशेने गेले. सगळ्यांसमोर तमाशा होऊ नये म्हणून मंचावरील इतर लोकांनी बोंडे यांना आवरले. त्यामुळे बोंडे परत जागेवर जाऊन बसले. मात्र एका लोकप्रतिनिधीने अशी वर्तणूक केल्याने उमाळे यांनी मंचावरच त्यांना परखड बोल सुनावले. तुम्ही वडीलधारे आहात, मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणार. मी माझे विचार मांडतो आहे व ज्यांना नाही पटत त्यांनी निघून जावे, असे उमाळे म्हणाले. बोंडे यांना मान खाली घालून संबंधित बोलणे ऐकून घ्यावे लागले. पोलिसांनी आणि आयोजकांनी तत्काळ मध्यस्थी करत दोघांचीही समजूत घालत कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. मात्र, या घडलेल्या प्रकाराची चर्चा व्हिडीओमुळे राज्यभरात होत आहे.