लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांवर मंगळवारी टाकलेल्या धाडीत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. बुधवारी ईडीचे अधिकारी कागदपत्रांच्या तपासणीत गुंतले होते. त्या आधारावर ईडीने अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय सागर भटेवरा यांच्यावर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी ईडीने देशमुख यांच्या निकटवर्तीय चार जणांवर धाडी टाकल्या होत्या. यामध्ये हरेकृष्णा अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील व्यापारी सागर भटेवरा, न्यू कॉलनी, सदर निवासी समित आयजॅक, जाफरनगर निवासी कादरी आणि छिंदवाडा मार्गावरील निवासी चर्चित सीएचा समावेश होता. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कागदपत्रे जप्त करून संबंधित लोकांची विचारपूस केली होती. दोन दिवसांपासून ईडीचे मुंबई आणि नागपूर विभागाचे अधिकारी चौकशीच्या टप्प्यात आलेल्या देशमुख कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांची पाळेमुळे खोदण्यात गुंतले आहेत. त्यांना सागर भटेवरा यांच्याशी लिंक जुळल्याचे दिसून येत आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांना भटेवरा यांचा मुंबईत फ्लॅट आणि अन्य संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे. भटेवरा यांची देशमुख यांच्याशी घनिष्ठता असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. देशमुख गृहमंत्री बनल्यानंतर भटेवरा सक्रिय झाले होते. ईडी सागर यांच्या संपत्तीची माहिती गोळा करीत आहे. सागर जवळपास २० वर्षांपासून देशमुख कुटुंबीयांशी जुळला आहे. मोठ्या गोडाऊनच्या संचालनात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. भटेवरा हे सुपारी व्यवसायाशी जुळले आहेत.