नागपूर : जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. एक वर्षापूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी चे आमदार फोडले. जनतेला हे आवडलेले नाही. दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीला चांगली खाती दिली, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे, हळुहळु ही नाराजी पुढे येईल. बाहेरच्या पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपद दिले जात नाही, यामुळे भाजपचे आमदारही खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आता तिसऱ्यांदा दिल्लीला गेले आहेत. कदाचित महाराष्ट्रातील काही प्रश्नांसाठी गेले असतील. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. दुबार, तीबार पेरणीची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. बियाणे, खते मिळाली पाहिजे. बोगस बियाणे आणि खतांवर सरकारने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
शक्ती कायद्याचे प्रारुप केंद्राकडे प्रलंबित
- गेल्या सहा महिन्यात राज्यातील ५ हजार ६०० तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र सरकारला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा चे प्रारूप तयार केले होते. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचे प्रावधान या कायद्यात आहेकेंद्र शासनाकडे हा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा सरकारने करण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली.