नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात वैद्यकीय कारणामुळे जामीनावर बाहेर आहेत. मात्र, बाहेर आल्यापासून ते सुदृढ दिसत आहेत. एकदाही त्यांचे प्रकृती स्वास्थ्य खालावलेले नाही. ते याचा फायदा घेऊन त्यांच्या विरोधातील पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे न्यायालयाने याची दखल घेत त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केली.
माजी गृहमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात शुक्रवारी आ. फुके यांनी उडी घेतली. पत्रकारांशी बोलताना फुके म्हणाले, अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर सोबतच न्यायव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेने याची दखल घेणे आवश्यक आहे. देशमुख यांनी एक पेन ड्राईव्ह दाखवित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. पण देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या काळात पोलीस भरतीसाठी, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आणि इतर कामांसाठी जो भ्रष्टाचार झाला त्याचे अनेक पेन ड्राईव्ह भाजपकडे आहेत. भाजप ते बाहेर काढेल, असा इशाराही यावेळी फुके यांनी दिला.