नागपूर : ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर माजी गृहमंत्री आ.अनिल देशमुख यांचे शनिवारी पहिल्यांदा नागपुरात आगमन झाले. विमानतळावर ढोल-ताशांच्या निनादात हजारो समर्थकांनी जयघोष करीत देशमुख यांचे जंगी स्वागत केले. तब्बल २१ महिन्यांनंतर स्वगृही परतलेले देशमुख समर्थकांची गर्दी पाहून गहिवरले. डोळे पुसत, मुठ आवळून हात जोडत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दुपारी दोन वाजेपर्यंत समर्थकांनी भरलेल्या सुमारे ६०० ते ७०० गाड्या विमानतळावर पोहोचल्या. काटोल विधानसभेसह विदर्भातून समर्थक आले होते. कार्यकर्ते ‘संघर्षयोद्धा’ असे लिहिलेले बॅनर, पोस्टर घेऊन पोहोचले होते. विमानतळापासून ते देशमुख यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले होते. विमानतळावर मुलगा सलिल देशमुख यांच्यासह अख्खे देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. देशमुख हे पत्नी आरतीताई यांच्यासह विमानतळाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आदिवासी नृत्याचा ठेवा, ढोल ताशांचा गजरात देशमुख हे सजविलेल्या खुल्या जिप्सीवर चढले व जमलेल्या समर्थकांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी समर्थकांचा उत्साह पाहून ते गहिवरले व त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
घरी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टीने स्वागत
- देशमुख हे सिव्हिल लाईन्समधील ‘श्रद्धा’ बंगल्यावर पोहोचताच प्रवेशद्वारावर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. घरासमोरही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला.
साईचे दर्शन, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकरांना नमन
- विमानतळावरून निघालेली रॅली वर्धा रोडवरील साई मंदिरात पोहोचली. येथे देशमुख यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेनेतर्फे स्वागत
- शिवसेनेतर्फे पंचशील चौकात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे नेते सतीश हरडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भव्य हार घालून देशमुख यांचे स्वागत केले.
खोटे आरोप करून फसविण्याचा प्रयत्न झाला : देशमुख
- विमानतळावर स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, माझ्यावर खोटे आरोप करून मला फसविण्याचा प्रयत्न झाला. १०० कोटी वसुलीचे आरोप झाले. पण, प्रत्यक्षात चार्जशिटमध्ये १.७१ कोटी लिहिण्यात आले. देशमुख यांच्यावर ऐकीव माहितीच्या आधारे आरोप करण्यात आल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब आढल्यानंतर आपण परमबीर सिंग यांना कमी दर्जाच्या पदावर हलविले होते. त्यामुळे त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले, पण मी सत्यासाठी लढा दिला, असे देशमुख यांनी सांगितले.