नागपूर : न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे आज नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली. तब्बल दीड वर्षानंतर देशमुख नागपुरात दाखल झाले असून कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या निनादात जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
गृहमंत्री असताना देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्या आधारावर ईडीने त्यांना अटक केली होती. कोर्टने सुनावणीदरम्यान त्यांच्याविरोधातील ईडीने सादर केलेले पुरावे फेटाळले व त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी कोर्टाला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर आज त्यांचे नागपुरात आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. भरगच्च फुलांनी सजविलेल्या खुल्या जीपवरून मिरवणूक काढण्यात आली. रस्ते कार्यकर्त्यांनी ओसंडले. "संघर्षयोद्धा" अशी टॅग लाईन वापरत राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांचे स्वागताचे होर्डिंगही लागले आहेत.