लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करीत राष्टÑपती यांनी अॅड. किलोर व अॅड. घरोटे यांच्यासह अॅड. नितीन सूर्यवंशी व अॅड. मिलिंद जाधव यांच्या नियुक्तीला मंजुरी प्रदान केली आहे. ४ मे २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी एकूण १० वकिलांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला सुचविली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या या कॉलेजियमने आवश्यक बाबी पडताळल्यानंतर पाच नावे अंतिम केली होती. त्यातील चार वकिलांना नवीन अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.अॅड. अनिल किलोर हे हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष असून या पदावर कार्यरत असताना न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले ते पहिले वकील होत. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील आहेत. त्यांनी नागपूर येथे अॅड. अरविंद बडे व अॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. ते गत २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढणारे वकील म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. त्यांनी विविध ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४० च्यावर जनहित याचिका दाखल केल्या व त्यात सकारात्मक आदेश मिळविले.अॅड. अविनाश घरोटे नागपूरकर असून त्यांचे वडील गुणवंतराव हे वकील होते. एल.एल. बी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना वकिली व्यवसायाचा ३३ वर्षांचा अनुभव आहे. दिवाणी प्रकरणांवर त्यांची विशेष पकड आहे. त्यांनी सर्वाधिक मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. ते नागपूर जिल्हा विधिज्ज्ञ संघटनेचे माजी सचिव आहेत.
अनिल किलोर व अविनाश घरोटे नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:27 AM