नागपूर : शिक्षणाला वय नसते. जिद्द मनात असली की ध्येय गाठण्यासाठी वयाचा अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनिल ओंकार हाेत. १९८१ साली व्हीएनआयटी (तेव्हा व्हीआरसीई)मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या ओंकार यांनी ४१ वर्षांनंतर म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी या विषयात पीएच. डी. प्राप्त केली. गुरुवारी व्हीएनआयटीच्या दीक्षांत समाराेहात त्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
साधारण कुटुंबातील अनिल ओंकार यांनी पदवी घेतल्यानंतर जाॅब सुरू केला. दाेन वर्षांनंतरच त्यांनी जाॅब साेडून स्वत:ची कंपनी स्थापन केली. आज त्यांची हिंगणा एमआयडीसी येथे स्टील फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. मधल्या काळात एका प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात संशाेधनात एम. टेक. करता येत असल्याची बाब त्यांनी समजली आणि त्यांनी पुन्हा शिक्षणाचा मार्ग धरला. दिवसा काम व रात्री अभ्यास करत त्यांनी २०१३ साली एम. टेक.ची पदवी संपादित केली. यादरम्यान त्यांना मनात अंथरूणात खिळलेल्या रुग्णांसाठी बहुपर्यायी बेड बनविण्याची कल्पना सुचली. याच विषयावर त्यांनी पीएच. डी.साठी अर्ज केला. सहा वर्षांत पीएच. डी. सादर करण्याचे बंधन असते. मात्र, संशाेधन अपूर्ण असल्याने त्यांनी ३ वर्षांचा अतिरिक्त काळ मागितला. अखेर ९ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी कल्पनेतील बेड साकार केलाच. या अत्याधुनिक बेडच्या निर्मितीसाठी दाेन पेटंट त्यांच्या नावावर आहेत. याच संशाेधनासाठी गुरुवारी पीएच. डी. प्रमाणपत्र त्यांच्या हातात पडले.
बेडला जाेडून टाॅयलेट, वाॅश बेसिन
ओंकार यांनी साकारलेला बेड अत्याधुनिक आहे. बटन दाबले की अटॅच टाॅयलेट ठराविक ठिकाणी येईल व काम झाले की बटन दाबताच फ्लशद्वारे स्वच्छ हाेऊन परत जागेवर जाईल. बेडला खुर्चीप्रमाणे व्यवस्था करून डायनिंग टेबल लावून जेवणही करता येईल. वाॅश बेसिनची व्यवस्थाही बेडला अटॅच आहे. आई आजारी असताना ओंकार यांनी याच बेडचा वापर केला हाेता. एक बेड कामठीमध्ये एकाला दिल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हा बेड बाॅयाेटाॅयलेटसह आणखी सुविधायुक्त करण्याचा मानस आहे. हा बेड स्वस्तात उपलब्ध व्हावा म्हणून एनजीओंशी बाेलणार असल्याचे ओंकार यांनी सांगितले.