महापारेषणचे अनिल पाटील यांची हायकोर्टात हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:38 AM2020-08-19T01:38:15+5:302020-08-19T01:39:26+5:30
भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.
महापारेषण कंपनीने खापरी-बुटीबोरी ट्रान्समिशन लाईनकरिता हरीहर बिल्डस्पेस कंपनीची जमीन वापरली आहे. २० मे २०१० रोजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी महापारेषणला ही जमीन वापरण्याची परवानगी देताना हरीहर बिल्डस्पेस कंपनीस एक महिन्यात या जमिनीची भरपाई देण्यात यावी, असा आदेशही दिला होता. परंतु, महापारेषणने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच, त्याही पुढे जाऊन ते कायद्यापेक्षा वरचढ असल्याची कृती केली. त्यामुळे हरीहर बिल्डस्पेस कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्या तारखेला न्यायालयाने महापारेषण कंपनीला फटकारून जिल्हा दंडाधिकारी व कायद्याबाबत अनादर दाखवल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये अशी परखड विचारणा केली होती. तसेच, पाटील यांना समन्स बजावून १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. पाटील यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली. हरीहर बिल्डस्पेसतर्फे अॅड. पी. एन. कोठारी यांनी कामकाज पाहिले.