श्याम नाडेकर
नागपूर: पशुखाद्याचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत दुधाचे दर वाढत नसल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. गाई-म्हैशीच्या खाद्य व चाऱ्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दुग्ध उत्पादक दोन्हीकडून आर्थिक संकटात सापडला. एकीकडे शासन दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन करीत आहे; परंतु दुग्ध व्यवसायाला शासनाकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने आम्ही दूध व्यवसाय करायचा की नाही, असा प्रश्न दुग्ध उत्पादक विचारत आहेत. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जाताे; मात्र पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. दुसरीकडे गत दोन वर्षांत दुधाचे दर मात्र वाढले नाहीत.
पशुखाद्याच्या दरात १० ते १५ रुपयांची दरवाढ झाली आहे. पशुखाद्यात टप्प्याटप्प्याने तीन ते चारपट वाढ झाली. त्याचवेळी दूधदरात मात्र दुप्पट वाढ झाली आहे. दुग्ध व्यवसायाची गेल्या १०-१२ वर्षांतील वाटचाल दूधदर १४५ टक्के वाढले, तर पशुखाद्याचे दर २२५ टक्के वाढले. शेती व्यवसायाला जोड व पूरक धंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळले. शासन विविध योजनांद्वारे त्यांना दुग्ध व्यवसायाकरिता प्रोत्साहन देतात. परंतु त्यांच्या दूध दरवाढीची मागणी सातत्याने दुर्लक्षित होत आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसायसुद्धा नुकसानीचा होत चालला आहे.
दूध उत्पादकांना गोळीपेंड, सुग्रास, सरकी पेंडचे पोते १० वर्षांपूर्वी ३८५ रुपयांला मिळत होते. आता तेच गत दोन वर्षांत ९६० रुपयांवरून १,२५० रुपये व आता तर चक्क १,६५० रुपयांवर पोहोचले. पशुखाद्यातील या ४०० टक्के दरवाढीचा तुलनात्मक विचार करता १० वर्षांपूर्वीचा गाईच्या दुधाचा दर साडेदहा रुपयांवरून ४२ रुपये, तर म्हैशीचे दूध १९ रुपयांवरून ६२ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या पदरात पडायला काहीच हरकत नव्हती. परंतु या सरकारचे धोरण दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे.
....