लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेमध्ये प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आपल्या अवतीभवतीच्या प्राण्यांना कोरोनाची लागण झाली तर काय, ही भीती बहुतेकांमध्ये निर्माण झाली आहे; मात्र अवतीभवतीच्या पाळीव प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाहीच, असा दावा पशुवैद्यकांनी केला आहे. कोरोना विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये महामारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा आजार माणसांकडून पशूंमध्ये गेला तर ही भीती व्यक्त केली जात आहे. अशात वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या माहितीने अधिकच शंका निर्माण केली आहे. मात्र पशुतज्ज्ञांच्या मते कोरोनाचा विषाणू सजीव नाही आणि हा आजार झोनॅटीक नाही. त्यामुळे माणसांकडून प्राण्यांमध्ये जाण्याचा धोका अजिबात नाही, असा दावा करण्यात येत आहे. पशुवैद्यक डॉ. नितीन शेंडे यांनी सांगितले, कोविड हा दोन प्रकारचा असतो. यामध्ये इंटेन्साईनल म्हणजे पोटाचा आणि दुसरा श्वसनाचा आजार होय. यातील पोटाचा कोरोना हा प्राण्यांमध्ये आढळून येतो. विशेषत: परदेशातून आणलेल्या कुत्रे किंवा मांजरांच्या प्रजातीत हा आजार दिसून येतो. देशी प्राण्यांमध्ये अद्यापतरी कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे प्राण्यांमध्ये होणाऱ्या कोरोनासाठी अनेक वर्षांपासून लस उपलब्ध आहे आणि घरी पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना ही लस देण्यात येते. गावठी कुत्रे किंवा मांजरांमध्ये तो आढळत नाही. सध्या दिसून येणारा कोरोनाचा विषाणू नवीन आहे, मात्र तो झोनॅटीक नाही, त्यामुळे प्राण्यांमध्ये शिरकाव होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय विदर्भात तापमान अधिक असल्याने कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे कुत्रे, कोंबड्या, बकरे आदींमधून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, ही केवळ अफवा आहे, असे मत डॉ. शेंडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असा दावा त्यांनी केला.
- अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आश्चर्यकारक आहे. कोरोना असेल असे वाटतही नाही. मात्र कोरोना असल्याचे सिद्ध झाल्यास तो संशोधनाचा विषय आहे. मात्र सध्यातरी पाळीव प्राण्यांमध्ये नवीन कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता दिसून येत नाही.- डॉ. नितीन शेंडे, पशुरोगतज्ज्ञ