लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणूस मानवात व्यस्त होता तेव्हा प्राणी आपल्या इलाख्यात होते. मानवाने निसर्गाच्या समतोलात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली आणि प्राण्यांनीही आपला उंबरठा ओलांडत मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याचे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
वनराई व अवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रीन टॉक’ या चर्चासत्रात आभासी माध्यमाद्वारे प्रमुख वक्ता म्हणून प्रभू बोलत होते. यावेळी गिरीश गांधी, जेरील बानाईत, नीलेश खांडेकर, जतीन घिया उपस्थित होते.
लोकांची भूक भागवणारा अन्नदाता नेहमी संकटात सापडण्याची कारणे अनेक आहेत. हवामानातील बदलामुळे अनेकदा पीक नष्ट होते. झाडतोडीचे शेतीवर दुष्परिणाम आहेत. अवकाळी पाऊस, कडक ऊन, पूरस्थिती अशा कारणांनी शेतकऱ्यांना योग्य तो भाव व लाभ मिळत नसल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. वनतोडीचाही परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका पातळीवर निसर्ग रक्षकाची नेमणूक करायला हवी आणि दहा तालुक्यांच्या निसर्ग रक्षकाला एक निसर्ग शिक्षक म्हणून काम करणे व पर्यावरण रक्षणाच्या कामाची माहिती व प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागणार असल्याचे प्रभू म्हणाले. संचालन डाॅ. जेरील बानाईत यांनी केले. यावेळी प्रदीपक राठी उपस्थित होते.
..........