नागपूर : लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना ही बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
सध्या राज्यात अनेक आंदोलने सुरू असून तुमचे आंदोलन आम्हाला परवडले नसते, त्यामुळे आम्ही लोकयुक्त विधेयक मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर अण्णांनी समाधान व्यक्त करत तुमच्या कारकिर्दीत हे विधेयक संमत करून घेतलेत याचा विशेष आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.
काही जणांचा हे विधेयक मांडण्याला विरोध होता, मात्र अण्णा जे काही सांगतील, सुचवतील ते सर्वसामान्य लोकांच्या भल्याचेच असेल याची खात्री पटल्याने या विधेयकाच्या मार्गातील सगळे अडथळे बाजूला करून ते संमत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी अण्णांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून फोन करून संवाद साधल्याबद्दल अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.