नागपूर : भाजपच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र सोशल माध्यमांवर भाजपच्या वर्धापनदिनासोबतच मागील अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस संजय जोशी यांचीदेखील चर्चा होती. संजय जोशी यांचा जन्मदिवस व भाजपचा वर्धापनदिन एकाच दिवशी येतात. हा अनोखा योगायोग साधून अनेक कार्यकर्ते व संघस्वयंसेवकांकडून जोशी यांना शुभेच्छा देण्याची चढाओढच लागली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून विजनवासात असलेले भाजप नेते संजय जोशी यांची नाळ नागपूरशी अद्यापही जुळली आहे. भाजप व संघ वर्तुळातील अनेक पदाधिकारी त्यांच्याशी संपर्कात असतात. संजय जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानण्यात येतात. गुजरात भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मोदी व जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. काही वर्षांपूर्वी नवी दिल्ली व नागपूर येथे संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. यावरून राष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.
त्यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून अनेक कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमांवर शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांकडून जंगी कार्यक्रम करण्यात येत असताना नागपुरातदेखील त्यांच्यावर ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
घरवापसी होणार का ?
संजय जोशी हे प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसले तरी ते अनेकांशी नियमित संवाद साधत असतात. संजय जोशी यांची घरवापसी होणार याची भाजपच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.