नागपूर : कोरोना महामारी काळात शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण चालू राहावे म्हणून शासनस्तरावर विविध प्रयत्न केले गेले. याच प्रयत्नातून नागपूर विभागाने ‘शाळे बाहेरची शाळा’ हा रेडिओ उपक्रम सुरू केला. १ मे २०२० पासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज या कार्यक्रमाचा १३७ वा भाग आहे. या माध्यमातून शिक्षणाचे कार्य वर्षभर सुरू राहिले.
नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते. नागपूर प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित कृतियुक्त कार्यक्रमाचा यात समावेश केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या भाषा, गणित, विज्ञान, समाजशाळा, इंग्रजी विषयाचा मूलभूत पाया पक्का केला जात आहे. खेडेगावात लाऊडस्पीकरच्या माध्यमातून राबविण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शिक्षक, पालक, विद्यार्थी, सरपंच, गावकरी यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागपुरातून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील ३० जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे त्याची परिणामकारकता दिसून आल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक व प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर यांनी सांगितले.