भाजपच्या ओबीसी मोर्चाची मागणी : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट यांच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांचे परंपरागत व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना ऑटोरिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. त्याच धर्तीवर न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट आदी बारा बलुतेदारांसाठी प्रत्येकी पाच हजारांचे आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशी मागणी नागपूर शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे शासनाकडे करण्यात आली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सचिव डी.डी. सोनटक्के, विदर्भ संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण, शहर भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रमेश चोपडे, प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सुमीत गाते, पूर्व शहर अध्यक्ष विजय बांगडे यांच्यासह शहर ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध व्हावे, यासाठी कोविड केअर सेंटर मोठ्या प्रमाणात शहर व तालुका मुख्यालयी सुरू करावे. याबाबत शासनस्तरावर कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाच्या आदेशानुसार राज्यभरात जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली.