नागपूर : महसूल व वन मंत्रालयाने राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये ४८ नव्या वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या पुढील तीन वर्षांसाठी असून वन्यजीव रक्षण आणि वन्यजीवांचा अभ्यास या निकषावर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी रोहित कारू, अजिंक्य भटकर आणि उधमसिंह यादव या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वाघांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एकमेव नियुक्ती आहे. विवेक करंबेळकर यांना येथे दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. मागील टर्ममध्ये येथे तीन मानद वन्यजीव रक्षक होते. या वेळीही चंद्रपुरातून तसेच गडचिरोलीमधून प्रत्येकी तीन व्यक्तींची नावे गेली होती. या दोनही जिल्ह्यांमधील जंगलाची व्याप्ती आणि कामाला असलेला वाव लक्षात घेता येथे तीन व्यक्ती नियुक्त होतील, असे अपेक्षित होते. मात्र एकाचीच नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मिलिंद उमरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यात नदिम खान आणि शाहीद परवेज खान या नव्या अभ्यासू युवकांची नियुक्ती झाली आहे. वर्धामध्ये कौशल मिश्र आणि संजय इंगळे तर यवतमाळमध्ये डॉ. रमजान विराणी, श्याम जोशी यांना संधी मिळाली आहे. अमरावतीमध्ये प्रा. सावन देशमुख आणि डॉ. जयंत वडतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात मुकुंद धुर्वे आणि सावन बहेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश सावर्डेकर यांनी ही नियुक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे.