नांदेड : ‘अब की बार किसान सरकार’, अशी घोषणा देत तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यभर धुराळा उडवून देणाऱ्या बीआरएसने महाराष्ट्रात पक्ष विस्तार गुंडाळला आहे. गेल्या एक ते दीड वर्षात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील बीआरएसच्या नेत्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. हा पक्ष परिवर्तन आघाडीतील घटक पक्ष राहणार असून, आगामी निवडणुका ताकदीने लढणार असल्याचेही धोंडगे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. लोकसभेला महाराष्ट्रातील बीआरएस नेत्यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे निवडणुका लढविण्याबाबत अनेकवेळा संपर्क साधला होता. परंतु बीआरएस राज्यात लोकसभेला तटस्थ राहिली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानेही बीआरएसकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे बीआरएसच्या राज्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे.
बीआरएसचा अब की बार किसान सरकार हा नारा घेऊनच एमआरएस रिंगणात उतरणार आहे. तसेच परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. त्यासाठी येत्या ५ सप्टेंबरला परिवर्तन आघाडीचा राज्याचा मेळावा नांदेडात होणार आहे, असेही माजी आमदार धोंडगे म्हणाले.