पोर्टलच बंद : वारंवार मुदतवाढ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील बहुतांश शिक्षक संघटनांचा विरोध असतानाही २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्याची तयारी सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना शासनाने दिले. त्यानुसार शिक्षकांनी माहिती भरायला सुरुवात केली. परंतु स्टाफ व ट्रान्सफर पोर्टलची संथगती आणि नियमितपणे सुरू नसल्याने आॅनलाईन बदल्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे बदल्यांचा फॉर्म केव्हा भरावा, यासाठी शिक्षक हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षी शासनाने बदल्या करण्याचे ठरविले. नव्याने बदल्यांचे धोरण आखण्यासाठी ६ जानेवारी २०१७ रोजी सर्व संघटनांच्या नेत्यांची मंत्रालयात बैठक घेतली. शिक्षकांची संख्या लक्षात घेता, जि.प. कर्मचाऱ्यांपासून शिक्षकांना वेगळे करून २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार बदल्याचे नवीन धोरण ठरविले. या परिपत्रकानुसार बदल्यांची गुंतागुंत लक्षात घेता अनेक संघटनांनी त्याला विरोध केला. न्यायालयातही धाव घेतली. शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष शिक्षक संवर्ग भाग १ मध्ये समावेश असणाऱ्या शिक्षकांना, मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकाऱ्यांना १७ ते २१ जूनपर्यंत ट्रान्सफर पोर्टलवर आॅनलाईन माहिती भरण्याचे आदेश दिले. परंतु या काळात शासन ट्रान्सफर पोर्टल सुरू करण्याचे विसरले. २० जूनपर्यंत पोर्टलच सुरू झाले नव्हते. त्यामुळे २४ जूनपर्यंत मुदत वाढवून दिली. पुन्हा २४ ते २८ करण्यात आली. परंतु २६ जूनपर्यंत पोर्टल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आजपर्यंत ट्रान्सफर पोर्टल नियमित सुरू झाले नाही. २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिकविणे, शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव करणे हे काम सोडून शिक्षक इंटरनेट कॅफेच्या चकरा मारत आहेत. अद्यापही भाग १ च्या ५० टक्के शिक्षकांची माहिती पूर्ण भरून झालेली नाही. विशेष शिक्षक संवर्ग भाग २ आणि अवघड क्षेत्रातील व सोप्या क्षेत्रातील शिक्षकांना ट्रान्सफर पोर्टलवर माहिती भरण्याची मुदत ३१ मेऐवजी ३० जून करण्यात आली आहे. अद्यापही १० ते १५ टक्के शिक्षकांची माहिती भरून झालेली नाही. अजून ८५ टक्के शिक्षक बाकी आहेत. यावरून आॅनलाईन बदल्यांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसते आहे. शासनाने केलाय आॅनलाईन बदल्यांचा पोरखेळ शासनाने बदल्या करण्याचे ठरविले होते तर संपूर्ण तयारीनिशी सज्ज असायला हवे होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे की बदलीचा फॉर्म भरण्यासाठी इंटरनेट कॅफेच्या चकरा मारायच्या. शासनाने बदल्यांचा नुसता पोरखेळ केला आहे. परशराम गोंडाणे, संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना
आॅनलाईन बदल्यांचा बोजवारा, शिक्षक हवालदिल
By admin | Published: June 29, 2017 2:44 AM