नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने २८ व्या राष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत रघु राय, जतीन दास व के़ लक्ष्मा गौड यांनी आज पत्रपरिषदेत केली़ यावेळी केंद्राचे संचालक डॉ़ पीयूष कुमार उपस्थित होते़ केंद्रातर्फे २८ वे राष्ट्रीय कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात देशभरातून १६९५ कलावंतांकडून ५०८५ कलाकृतींच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या़ त्यातून २१४ कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्यात. यातील आठ कलाकृतींना पुरस्कार जाहीर झाला असून दहा कलावंतांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे़ ज्युनिअर गटातील चार कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे़ सिनियर गटातील चार कलावंतांना प्र्रत्येकी दोन-दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल़ कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दहा कलावंतांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल़या निवडक २१४ कलाकृतींचे प्रदर्शन १ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान दुपारी १२ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान केंद्रात आयोजित करण्यात आले आहे़ या कलाकृतींचे प्रदर्शन १७ ते २६ एप्रिल दरम्यान भोपाळ येथील भारत भवनातही आयोजित करण्यात आले आहे़, अशी माहिती केंद्र संचालक पीयूषकुमार यांनी दिली. (प्रतिनिधी)
कला प्रदर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा
By admin | Published: April 01, 2015 2:30 AM