लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. कर्मचारी पाच दिवस निदर्शने करणार असून मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.२५ फेब्रुवारी २०१० च्या आदेशानुसार मागण्या मान्य करण्यात आल्या असून बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत २ फेब्रुवारी २०११ ला करार करण्यात आला आहे. करारानंतरही संघटनेला स्थगितीची कुठलीही पूर्वसूचना न देता आणि व्यवस्थापनाला अधिकार नसताना एप्रिल २०१४ पासून नियमित सुरू असलेली वार्षिक पगारवाढ आणि मे २०१५ पासून महागाई भत्ता रोखण्यात आला. ही बाब ध्यानात येताच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी मार्च-२०१८ च्या ताळेबंदात या देयकाची तरतूद केली होती.बँकेचे प्राधिकृत मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी रोखण्यात आलेली वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता सप्टेंबर २०१८ च्या पगारात लागू केली आणि यापोटी देय असलेल्या फरकाची रक्कम कशा प्रकारे देता येईल याचा प्रस्ताव संघटनेकडून मागविण्यात आला होता. फरकाची रक्कम ठेवी आणि रोखीच्या स्वरुपात देण्याचा प्रस्ताव संघटनेने दिला होता. तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी नागपुरात प्राधिकृत मंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता रोखता येत नसल्याचे स्पष्ट करून प्राधिकृत मंडळावर ताशेरे ओढले होते.पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०१८ रोजी बँकेला ३४.६० कोटी रुपयांचा चलित नफा झाला असून बँकेचा सीआरएआर १५.७० टक्के आहे. नफ्यातून फरकाच्या रकमेची तरतूद करण्यात आली असतानाही बँक कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करीत नाही. कर्मचाऱ्यांची रक्कम बँकेला दुसरीकडे वापरायची असल्याचे दिसून येते.बँकेच्या प्रगतीसाठी कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही संघटनेने दिली असतानाही बँक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखेडे यांनी कर्मचाºयांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली.आंदोलनात युनियनचे पदाधिकारी विजय शहाणे, चंद्रकांत रोठे, किशोर आसटकर, मिलिंद घोडमाडे, जयंता आदमने, प्रशांत साळुंखे, शरयू काळबांडे, प्रकाश मेश्राम, प्रशांत डहाके, रमेश इंगोले, प्रमोद फुलबांधे, अनुप पाटील, जेठानी, बाळू ढोबळे, विजय भोसले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
वार्षिक पगारवाढ व महागाई भत्ता द्या : नागपुरात जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 9:37 PM
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. कर्मचारी पाच दिवस निदर्शने करणार असून मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
ठळक मुद्देप्राधिकृत मंडळाचा बेकायदेशीर निर्णय